Saturday, August 31, 2024

सुरेल युरोप यात्रा

 

सुरेल युरोप यात्रा

लेखक :अरविंद  परांजपे


र्लिन मधल्या सतारवादनाच्या त्या मैफिलीत वाजणाऱ्या टाळ्या मैफल संपल्यावर बराच वेळ वाजत होत्या. २ जून २०२३ च्या संध्याकाळी  तेथे कार्ल मार्क्स स्ट्रीट वरच्या संगीत कार्यक्रम करणाऱ्या एका छोटेखानी हॉलमध्ये आम्ही केलेल्या वादनाला दाटीवाटीने भारतीय बैठकीवर बसलेल्या जर्मन श्रोत्यांनी मनापासून दाद दिली. मी तबल्याची साथ केली होती. या सायंकालीन मैफिलीत पुण्यातील सतारवादक ज्योती ठकार यांनी  बिहाग, जयजयवंती, जोग आणि भैरवी रागात एकूण चार रचना सादर केल्या होत्या. सतारवादन करणारी उज्जैन मधील बीनकारांची  परंपरा असलेल्या अष्टेवाले घराण्यातील ज्योती यांची ही  सहावी पिढी.  ही मैफल ठरवली होती कॅथरिन लॅम्ब या  व्हायोला वाजवणाऱ्या कलावतीने.  ती मूळची अमेरिकन आहे आणि जर्मनीत  कार्यक्रम करते. विशेष म्हणजे या मैफिलीत तिने तिच्याकडे असलेला तानपूरा सुरात लावून वाजवला. आम्ही वाजवलेल्या चारही रागानंतर (आता टाळ्या झाल्याच पाहिजे असे निवेदकाने न म्हणता!) उत्स्फूर्तपणे वाजलेल्या टाळ्या भारतीय संगीताची महानता सिद्ध करत होत्या.

देश आणि  भाषा यापलीकडे जाऊन सच्चे सूर मानवी मनाला जाऊन भिडतात याचा अनुभव आम्हाला आमच्या ऑस्ट्रेलियातील दौऱ्यानंतर मे-जून २०२३ मध्ये केलेल्या फ्रांस आणि जर्मनी या देशात  केलेल्या सहा मैफिलीत पन्हा एकदा आला. याचे श्रेय अर्थातच संगीत क्षेत्रात दैदीप्यमान कामगिरी करणाऱ्या पूर्वसूरीना दिले पाहिजे. पं. रवीशंकर यांनी सतार हे वाद्य युरोप आणि अमेरिकेत लोकप्रिय केले आणि त्यानंतर उस्ताद अलि अकबर खान, पं. हरिप्रसाद चौरसिया, पं. राम नारायण, ऊ. झाकीर हुसेन  यांसारख्या अनेक कलाकारांनी विदेशात भारतीय अभिजात संगीताची गोडी लावली.

पूर्णत: परदेशी रसिकांच्या उपस्थितीचा असाच अनुभव आम्हाला त्याआधी २१ एप्रिलला पॅरिसमधल्या मंडपं या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या संस्थेत केलेल्या कार्यक्रमातही आला. तेथे असलेले श्रोते हे फ्रेंच नागरिक होते. परंपरेनुसार ‘आलाप-जोड- झाला, विलंबित आणि द्रुत गत’ शा पद्धतीने सलग दीड तासाचे सतारवादन श्रोत्यांच्या पसंतीला उतरले. ही मैफल यशस्वी होण्यात ज्योती ठकारांची गुरुभगिनी सतारवादक स्मिता नागदेव हिने प्रयत्न केले होते आणि ती स्वत:ही उपस्थित होती. पॅरिसमधली ही मैफिल ऐकायला डॉ. अब्दुल कलाम यांचे इस्रो मधील गुरू डॉ. एकनाथ चिटणीस  यांचे चिरंजीव डॉ.  चेतन हे  सपत्नीक उपस्थित होते. डॉ. चेतन हे पॅरिसच्या लुई पाश्चर इंस्टिट्यूट मध्ये मलेरियावरच्या  लशीवर  संशोधन करणारे शास्त्रज्ञ आहेत. अत्यंत प्रतिष्ठेचे शांतिस्वरूप भटनागर आणि इन्फोसिस शास्त्रज्ञ असे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी २५ ऑगस्टला आपल्या वादलांच्या डॉ. एकनाथ चिटणीस ९८ व्या वाढदिवासानिमित्त सतार वादनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.  

महाराष्ट मंडळातील कार्यक्रम 
‘ महाराष्ट मंडळ, फ्रांसच्या वाढदिवसकार्यक्रमात २० मे या दिवशी तुमचे सतार वादन ठरवले आहे’ असे  मंडळाच्या सेक्रेटरी  मृणाल गर्दे यांनी कळवल्यानंतर,  मी आणि माझी पत्नी सीमा, सौ. ज्योती आणि नारायण ठकार अशा चौघांचा युरोप दौरा निश्चित केला. वाढदिवसाच्या कार्यक्रमाची पूर्वार्धातील महाराष्ट्र दिन ही संकल्पना होती. या  निमित्ताने मंडळाच्या ४ ते ७५ वर्षे  वयाच्या  सभासदानी शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग, मराठी कविता, गाणी, नृत्य असे प्रकार सादर केले.  नऊवारी साड्या नेसलेल्या मुली आणि ऐतिहासिक काळातील वेशभूषा केलेली छोटी मुले यांनी उत्साहाने कार्यक्रम करून आनंद दिला. परदेशात जन्मलेल्या या छोट्या मुलांकडून मराठी संवाद पाठ म्हणून घेणारा अभिजीत शेगांवकर यांचे विशेष अभिनंदन. मंडळाचा तरुण सभासद अमोल बेरी याने पॅरिसमधील आमच्या मुक्कामाची  सोय केली आणि तो आम्हाला घ्यायला विमानतळावर न्यायलाही आला.  पॅरिसमध्ये अनेक वर्षे वास्तव्य असलेले मंडळाचे संस्थापक सदस्य श्री. शशिकाका धर्माधिकारी यांनी ते लिहित असलेल्या शिवाजी महाराजांच्या अस्सल चित्राविषयीच्या पुस्तकाची माहिती दिली. आम्ही पॅरिस मध्ये रहात असलेल्या  एअरबीएनबीची ज्यू मालकीण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होती आणि तिने घरी केलेला केक दुसऱ्या दिवशी आम्हाला खायला  घालून आपली दाद  दिली.  इंग्लंडमध्ये असलेले  माझे मित्र सुधाकर आचवल आणि  गुरू सोहोनी यांना  इंग्लंडमध्ये आमची मैफल  आयोजित  करायची होती,  पण ते आम्हाला शक्य झाले नाही.   त्यामुळे मैफल ऐकायला म्हणून ते दोघेही सपत्नीक पॅरिसला आले होते.  अशी रसिकता आणि मित्रप्रेम शब्दातीत आहे!

पॅरिसचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही तीन दिवसांच्या दक्षिण फ्रान्सच्या दौर् यावर गेलो. तिथे आमचे मित्र डॉ.  विश्वास आणि रेखा वाडेकर यांच्याकडे आम्ही पाहुणचार घेतला. ला डिराट या खेड्यामध्ये त्यांचा दोन मजली बंगला आहे. विशेष म्हणजे त्यांचं असंच टुमदार घर ऑक्सफर्डलाही जिथे आम्ही गेलो होतो. हे दोघेही अत्यंत हुशार आणि उच्चशिक्षित आहेत. विद्यापीठ आणि कंपन्यांमध्ये अनेक वर्षे संशोधक म्हणून काम केल्यानंतर आता निवृत्त झाल्यावर फ्रांस, इंगलंड आणि भारत या तीनही देशात त्यांचे वास्तव्य असते. आहेत. त्यांना सर्वांचं अगत्य आहे. रेखाताईनी  उत्तम खाद्यपदार्थ केले  आणि विश्वासनी तिथल्या खेड्यांमध्ये आम्हाला छान फिरवले.  दक्षिण फ्रांस हे  वायनरीकरता प्रसिद्ध आहे.  द्राक्षांच्या  शेकडो एकर पसरलेल्या बागा आम्हाला बघायला मिळाल्या. डोंगर, झाडी, तलाव,नदी, पक्षी असा सृष्टिसौंदर्याचा आनंद मिळाला.  तेथील कारकासोन या गावातल्या १३ व्या  शतकात बांधलेला एक कॅसल आहे. या  किल्ल्यावर आम्ही चढून गेलो.  फ्रान्समधील खेडी भारतातल्या खेड्याप्रमाणे खेडी वाटत नाही. कारण तेथील सर्व रस्ते, घरे, हे सगळे  शहरांसारखे  सुव्यवस्थित आणि उत्तम स्थितीत आहेत. लोकसंख्याही  फारच कमी आणि वर्षभर पडणारा पाऊस यामुळे नैसर्गिक हिरवाई टिकून राहते.  वाडेकरांचा पाहुणचार घेऊन 360 किलोमीटरपर्यन्त  वेगाने धावणाऱ्या टीजीव्ही ट्रेनने आम्ही जर्मनीतल्या  स्टुटगार्टला जायला निघालो. फ्रांस- जर्मनी मधला रेल्वे प्रवास भारताच्या तुलनेत महाग असला तरी सुखसोयीचा आणि वेगवान आहे. पण आठ दिवसांत दोनदा आम्हाला रेल्वे गाडी  रद्द झाल्याचा त्रास झालाच. पर्यायी व्यवस्था केली होती, पण जर्मन भाषा येत नसल्याने तेथील रेल्वेने दिलेल्या सूचना समजत नव्हत्या. इतर प्रवाशांनाही  विचारणे  अवघड होते कारण त्यांना इंग्रजी भाषा येत असेल यांची खात्री नसे.  




जर्मनीतील कार्यक्रम

माझा मित्र अविनाश बडवे याची मुलगी बागेश्री ही जर्मनीमध्ये स्टूटगार्ट येथे असते. तिच्या ओळखीने तेथील महाराष्ट्र मंडळाच्या जुई नातूशी संपर्क झाला आणि त्यांनी २७  मे या दिवशी सतारवादनाचा कार्यक्रम ठरवला. या मंडळाचे सभासद हे सगळी तरुण मुलं मुली आहेत. त्यांच्यात उत्साह आहे. पण त्यांना भारतीय संगीताचा  खूपसा परिचय नव्हता. कार्यक्रम शनिवारी करणे सोयीचे होते, पण  ‘लॉन्ग  वीकएंड’ आल्याने किती
मंडळी येतील आणि फक्त सतारीचा कार्यक्रम दीड तास ते कसा ऐकतील अशा रास्त शंका त्यांना होत्या.  परंतु ‘सतारीचे सूर हे सर्व श्रोत्यांचे रंजन करतात’ हा आमचा ऑस्ट्रेलियातील  प्रमुख शहरांचा चार दौऱ्यांचा अनुभव मी त्यांना सांगितल्यावर त्यांनी हे आव्हान स्वीकारले  आणि मनापासून तयारी केली. तेथील एका मोठ्या सभागृहात आधुनिक ध्वनी व्यवस्थेसह हा कार्यक्रम झाला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला लहान मुलेही पहिल्या रांगेत बसून शांतपणे ऐकत होती. काही अमराठी भारतीय सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. शास्त्रीय संगीत न ऐकलेल्या या रासिकांकरता सुरवातीला आम्ही रागावर आधारित प्रसिद्ध गीत वाजवून मग तो राग वाजवला. उदा: पुरिया धनाश्री रागातले प्रसिद्ध गीत ‘जीवलगा राहिले दूर घर माझे’ आणि नंतर झपताल आणि त्रितालातील बंदिशी वाजवल्या. त्यानंतरचे चार दिवस आम्ही हायडेलबर्ग येथे ज्योती ठकार यांचा मुलगा डॉ. नकूल याच्या घरी राहिलो होतो. तेथील सुप्रसिद्ध बीएएसएफ या कंपनीत तो संशोधन अधिकारी आहे. केमिकल इंजिनीरिंग मधील पेटंटस नावावर जमा असलेला नकूल पं. योगेश समसी यांच्याकडे तबलाही शिकतो आहे. हायडेलबर्गच्या जवळ असलेल्या ककू क्लॉक करता प्रसिद्ध असलेल्या ब्लॅक फॉरेस्ट आणि तेथील किल्ला यांनाही आम्ही बेट दिली.  युरोपमधील सर्व शहरांप्रमाणे दैनंदिन प्रवासाकरता सायकलीचा वापर करणारे सर्व वयातील स्त्री-पुरुष इथेही दिसले.

इंटरनॅशनल फेस्टिव्हल मध्ये वादन

 जूनला बर्लिन पासून तीन तासांच्या अंतरावर असलेले ब्राऊनश्वाईक येथे आंतरराष्ट्रीय उत्सवात भाग घेण्याची भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी तेथील मंडळाचे अध्यक्ष अमोल भागवत यांच्या निमंत्रणांमुळे मिळाली. तेथे दिवसभर चाललेल्या  या उत्सवामध्ये २० देशांचे नागरिक


नृत्य, गायन यांचा समावेश असलेले मनोरंजक कार्यक्रम सादर केली. त्याबरोबरीने  विविध देशांच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल ही होते. आम्हाला दिलेल्या अर्ध्या तासात वृंदावनी सारंग रागातील मध्य आणि द्रुत लयीतली गत आणि ‘वैष्णव जन’ हे भजन आम्ही सादर केले. त्यानंतर अमोल भागवत यांचा गायनात करीयर करणारा मुलगा वरद याने भारतीय आणि पाश्चात्य संगीतामधील गाणी सादर केली.  त्याबरोबर तबल्याची साथ मी केली होती. भारतीय संगीताला विविध देशातील नागरिकांसमोर  सादर करण्याचे श्रेय ब्राव्हो मंडळाचे अमोल भागवत आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आहे. ब्राऊनश्वाईक कौंसिल आणि महाराष्ट्र मंडळ यांच्यात पार्टनरशिप झाल्यामुळे संधी मिळू शकली.

 

 

आमचा शेवटचा कार्यक्रम बर्लिन मराठी मंडळातर्फे बर्लिन मधल्या डॉयचे बँकेत अधिकारी असलेल्या आणि सतार शिकत असलेल्या अमोल सायनीसने आयोजित केला होता. बर्लिन मधील आमचे वास्तव्य सुखाचे होईल याची संपूर्ण काळजी त्याने घेतली. तेथील ऐतिहासिक स्थळे बघण्याकरता बस-ट्रॅम चे मार्ग सांगून मोलाचे मार्गदर्शनही केले. विशेष हे की यापल्या शारीरिक मर्यादा बाजूला ठेऊन त्याने आमचा कार्यक्रम जवळजवळ एकट्याने  आयोजित केला. यामध्ये त्याला पं. वि
जय कोपरकरांकडे गाणे शिकणारा आर्किटेक्ट रौनक काळे  यांची मदत झाली. ३ जूनच्या सकाळी अमोल सायनीसच्या घरी झालेली  सतार- गायन -तबला अशी एकत्र मैफल छान रंगली.  दुपारी बर्लिन स्कूल ऑफ म्युझिक मध्ये झालेल्या  मैफिलीला बर्लिन मध्ये वास्तव्यास असलेल्या एक अमेरिकन स्त्री तबलावादक लॉरा पेटशेन याही  आल्या होत्या. विशेष म्हणजे त्यांनी दोन्ही मैफिलीना उपस्थित राहून त्यांनी दाद दिली.  त्या  गेली ३५ वर्षे तबला शिकत आहेत आणि तेथे तबला शिकवतात आणि कार्यक्रमांना साथ करतात.

 

युरोपमधील मराठी मंडळी  

बर्लिनमधले रोहित प्रभू  यांची ओळख पुण्यातील जर्मन भाषेच्या प्राध्यापिका डॉक्टर सविता केळकर यांनी करून दिली होती. उत्कृष्ट अध्यापक म्हणून 

सन्मान प्राप्त  झालेल्या सविताताई गेली अनेक वर्षे भारत आणि जर्मनी यांच्यामध्यें संस्कृतिक संबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने मोलाचे काम करत आहेत.  या कामगिरीबद्दल सविताताईना  जर्मन सरकारचा ऑर्डर ऑफ मेरिट पुरस्कारही मिळालेला आहे. रोहित प्रभु यांनी नंतर अमोल भागवत आणि अमोल सायनीस  यांच्याशी ओळख करून दिली आणि आमचे कार्यक्रम ठरले. आपापल्या क्षेत्रात  उत्तम कामगिरी बजावत मराठी मंडळांचे पदाधिकारी आणि स्वयंसेवक आपल्या नोकऱ्या सांभाळून पदराला खार लावून स्वत;चा वेळ घालवून मंडळाचे काम करतात. विदेशात  महाराष्ट्रीय  आणि भारतीय संस्कृतीची जपणूक करावी ही त्यांची धडपड असते.  सुप्रसिद्ध कलाकारांच्या कार्यक्र0

माला सभासदांची पसंती असल्याने त्यांना बोलावण्याकडे त्यांचा कल असतो. पण आमच्या सारख्या नाव नसलेल्या संगीतोपासकांचे कार्यक्रम या मंडळानी आयोजित केले हे विशेष आहे. कारण तेथील मंडळीना, विशेषत: तरुणांना फक्त वाद्य संगीत कितपत आवडेल यांची रास्त शंका आयोजकाना होती. पण आपल्या मुलांना उच्च दर्जाच्या हिंदुस्तानी संगीत ऐकवण्याची आमची विनंती या मंडलांनी मान्य केली. कार्यक्रम सादर करताना भारतीय रागसंगीत, सतार आणि तबला ही वाद्ये, याविषयी थोडीशी माहिती मी देत असे. ‘या निवेदानामुळे आम्हाला  वादनाचा आस्वाद अधिक चांगल्या रीतीने घेता आला’ असे काहीनी आवर्जून सांगितले. युरोपमधल्या या मंडळींशी आमचे स्नेहबंध  जुळले आहेत.  ‘धन्य ते गायनी कला’ असे समर्थ रामदासांनी वर्णन करून संगीत कलेची महती सांगितली आहे. भविष्यकालातही या थोर संगीत कलेचा परिचय  युरोपमधील तरुण पिढीला करून देण्याकरता आम्ही उत्सुक आहोत.

 

 Author: Arvind Paranjape,

asparanj@gmail.com, +919850569075

 

(for more information on the Artists: https://thakarsitar.wordpress.com and www.arvindparanjape.in)

*****

Labels:

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home