Saturday, August 31, 2024

सुरेल युरोप यात्रा

 

सुरेल युरोप यात्रा

लेखक :अरविंद  परांजपे


र्लिन मधल्या सतारवादनाच्या त्या मैफिलीत वाजणाऱ्या टाळ्या मैफल संपल्यावर बराच वेळ वाजत होत्या. २ जून २०२३ च्या संध्याकाळी  तेथे कार्ल मार्क्स स्ट्रीट वरच्या संगीत कार्यक्रम करणाऱ्या एका छोटेखानी हॉलमध्ये आम्ही केलेल्या वादनाला दाटीवाटीने भारतीय बैठकीवर बसलेल्या जर्मन श्रोत्यांनी मनापासून दाद दिली. मी तबल्याची साथ केली होती. या सायंकालीन मैफिलीत पुण्यातील सतारवादक ज्योती ठकार यांनी  बिहाग, जयजयवंती, जोग आणि भैरवी रागात एकूण चार रचना सादर केल्या होत्या. सतारवादन करणारी उज्जैन मधील बीनकारांची  परंपरा असलेल्या अष्टेवाले घराण्यातील ज्योती यांची ही  सहावी पिढी.  ही मैफल ठरवली होती कॅथरिन लॅम्ब या  व्हायोला वाजवणाऱ्या कलावतीने.  ती मूळची अमेरिकन आहे आणि जर्मनीत  कार्यक्रम करते. विशेष म्हणजे या मैफिलीत तिने तिच्याकडे असलेला तानपूरा सुरात लावून वाजवला. आम्ही वाजवलेल्या चारही रागानंतर (आता टाळ्या झाल्याच पाहिजे असे निवेदकाने न म्हणता!) उत्स्फूर्तपणे वाजलेल्या टाळ्या भारतीय संगीताची महानता सिद्ध करत होत्या.

देश आणि  भाषा यापलीकडे जाऊन सच्चे सूर मानवी मनाला जाऊन भिडतात याचा अनुभव आम्हाला आमच्या ऑस्ट्रेलियातील दौऱ्यानंतर मे-जून २०२३ मध्ये केलेल्या फ्रांस आणि जर्मनी या देशात  केलेल्या सहा मैफिलीत पन्हा एकदा आला. याचे श्रेय अर्थातच संगीत क्षेत्रात दैदीप्यमान कामगिरी करणाऱ्या पूर्वसूरीना दिले पाहिजे. पं. रवीशंकर यांनी सतार हे वाद्य युरोप आणि अमेरिकेत लोकप्रिय केले आणि त्यानंतर उस्ताद अलि अकबर खान, पं. हरिप्रसाद चौरसिया, पं. राम नारायण, ऊ. झाकीर हुसेन  यांसारख्या अनेक कलाकारांनी विदेशात भारतीय अभिजात संगीताची गोडी लावली.

पूर्णत: परदेशी रसिकांच्या उपस्थितीचा असाच अनुभव आम्हाला त्याआधी २१ एप्रिलला पॅरिसमधल्या मंडपं या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या संस्थेत केलेल्या कार्यक्रमातही आला. तेथे असलेले श्रोते हे फ्रेंच नागरिक होते. परंपरेनुसार ‘आलाप-जोड- झाला, विलंबित आणि द्रुत गत’ शा पद्धतीने सलग दीड तासाचे सतारवादन श्रोत्यांच्या पसंतीला उतरले. ही मैफल यशस्वी होण्यात ज्योती ठकारांची गुरुभगिनी सतारवादक स्मिता नागदेव हिने प्रयत्न केले होते आणि ती स्वत:ही उपस्थित होती. पॅरिसमधली ही मैफिल ऐकायला डॉ. अब्दुल कलाम यांचे इस्रो मधील गुरू डॉ. एकनाथ चिटणीस  यांचे चिरंजीव डॉ.  चेतन हे  सपत्नीक उपस्थित होते. डॉ. चेतन हे पॅरिसच्या लुई पाश्चर इंस्टिट्यूट मध्ये मलेरियावरच्या  लशीवर  संशोधन करणारे शास्त्रज्ञ आहेत. अत्यंत प्रतिष्ठेचे शांतिस्वरूप भटनागर आणि इन्फोसिस शास्त्रज्ञ असे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी २५ ऑगस्टला आपल्या वादलांच्या डॉ. एकनाथ चिटणीस ९८ व्या वाढदिवासानिमित्त सतार वादनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.  

महाराष्ट मंडळातील कार्यक्रम 
‘ महाराष्ट मंडळ, फ्रांसच्या वाढदिवसकार्यक्रमात २० मे या दिवशी तुमचे सतार वादन ठरवले आहे’ असे  मंडळाच्या सेक्रेटरी  मृणाल गर्दे यांनी कळवल्यानंतर,  मी आणि माझी पत्नी सीमा, सौ. ज्योती आणि नारायण ठकार अशा चौघांचा युरोप दौरा निश्चित केला. वाढदिवसाच्या कार्यक्रमाची पूर्वार्धातील महाराष्ट्र दिन ही संकल्पना होती. या  निमित्ताने मंडळाच्या ४ ते ७५ वर्षे  वयाच्या  सभासदानी शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग, मराठी कविता, गाणी, नृत्य असे प्रकार सादर केले.  नऊवारी साड्या नेसलेल्या मुली आणि ऐतिहासिक काळातील वेशभूषा केलेली छोटी मुले यांनी उत्साहाने कार्यक्रम करून आनंद दिला. परदेशात जन्मलेल्या या छोट्या मुलांकडून मराठी संवाद पाठ म्हणून घेणारा अभिजीत शेगांवकर यांचे विशेष अभिनंदन. मंडळाचा तरुण सभासद अमोल बेरी याने पॅरिसमधील आमच्या मुक्कामाची  सोय केली आणि तो आम्हाला घ्यायला विमानतळावर न्यायलाही आला.  पॅरिसमध्ये अनेक वर्षे वास्तव्य असलेले मंडळाचे संस्थापक सदस्य श्री. शशिकाका धर्माधिकारी यांनी ते लिहित असलेल्या शिवाजी महाराजांच्या अस्सल चित्राविषयीच्या पुस्तकाची माहिती दिली. आम्ही पॅरिस मध्ये रहात असलेल्या  एअरबीएनबीची ज्यू मालकीण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होती आणि तिने घरी केलेला केक दुसऱ्या दिवशी आम्हाला खायला  घालून आपली दाद  दिली.  इंग्लंडमध्ये असलेले  माझे मित्र सुधाकर आचवल आणि  गुरू सोहोनी यांना  इंग्लंडमध्ये आमची मैफल  आयोजित  करायची होती,  पण ते आम्हाला शक्य झाले नाही.   त्यामुळे मैफल ऐकायला म्हणून ते दोघेही सपत्नीक पॅरिसला आले होते.  अशी रसिकता आणि मित्रप्रेम शब्दातीत आहे!

पॅरिसचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही तीन दिवसांच्या दक्षिण फ्रान्सच्या दौर् यावर गेलो. तिथे आमचे मित्र डॉ.  विश्वास आणि रेखा वाडेकर यांच्याकडे आम्ही पाहुणचार घेतला. ला डिराट या खेड्यामध्ये त्यांचा दोन मजली बंगला आहे. विशेष म्हणजे त्यांचं असंच टुमदार घर ऑक्सफर्डलाही जिथे आम्ही गेलो होतो. हे दोघेही अत्यंत हुशार आणि उच्चशिक्षित आहेत. विद्यापीठ आणि कंपन्यांमध्ये अनेक वर्षे संशोधक म्हणून काम केल्यानंतर आता निवृत्त झाल्यावर फ्रांस, इंगलंड आणि भारत या तीनही देशात त्यांचे वास्तव्य असते. आहेत. त्यांना सर्वांचं अगत्य आहे. रेखाताईनी  उत्तम खाद्यपदार्थ केले  आणि विश्वासनी तिथल्या खेड्यांमध्ये आम्हाला छान फिरवले.  दक्षिण फ्रांस हे  वायनरीकरता प्रसिद्ध आहे.  द्राक्षांच्या  शेकडो एकर पसरलेल्या बागा आम्हाला बघायला मिळाल्या. डोंगर, झाडी, तलाव,नदी, पक्षी असा सृष्टिसौंदर्याचा आनंद मिळाला.  तेथील कारकासोन या गावातल्या १३ व्या  शतकात बांधलेला एक कॅसल आहे. या  किल्ल्यावर आम्ही चढून गेलो.  फ्रान्समधील खेडी भारतातल्या खेड्याप्रमाणे खेडी वाटत नाही. कारण तेथील सर्व रस्ते, घरे, हे सगळे  शहरांसारखे  सुव्यवस्थित आणि उत्तम स्थितीत आहेत. लोकसंख्याही  फारच कमी आणि वर्षभर पडणारा पाऊस यामुळे नैसर्गिक हिरवाई टिकून राहते.  वाडेकरांचा पाहुणचार घेऊन 360 किलोमीटरपर्यन्त  वेगाने धावणाऱ्या टीजीव्ही ट्रेनने आम्ही जर्मनीतल्या  स्टुटगार्टला जायला निघालो. फ्रांस- जर्मनी मधला रेल्वे प्रवास भारताच्या तुलनेत महाग असला तरी सुखसोयीचा आणि वेगवान आहे. पण आठ दिवसांत दोनदा आम्हाला रेल्वे गाडी  रद्द झाल्याचा त्रास झालाच. पर्यायी व्यवस्था केली होती, पण जर्मन भाषा येत नसल्याने तेथील रेल्वेने दिलेल्या सूचना समजत नव्हत्या. इतर प्रवाशांनाही  विचारणे  अवघड होते कारण त्यांना इंग्रजी भाषा येत असेल यांची खात्री नसे.  




जर्मनीतील कार्यक्रम

माझा मित्र अविनाश बडवे याची मुलगी बागेश्री ही जर्मनीमध्ये स्टूटगार्ट येथे असते. तिच्या ओळखीने तेथील महाराष्ट्र मंडळाच्या जुई नातूशी संपर्क झाला आणि त्यांनी २७  मे या दिवशी सतारवादनाचा कार्यक्रम ठरवला. या मंडळाचे सभासद हे सगळी तरुण मुलं मुली आहेत. त्यांच्यात उत्साह आहे. पण त्यांना भारतीय संगीताचा  खूपसा परिचय नव्हता. कार्यक्रम शनिवारी करणे सोयीचे होते, पण  ‘लॉन्ग  वीकएंड’ आल्याने किती
मंडळी येतील आणि फक्त सतारीचा कार्यक्रम दीड तास ते कसा ऐकतील अशा रास्त शंका त्यांना होत्या.  परंतु ‘सतारीचे सूर हे सर्व श्रोत्यांचे रंजन करतात’ हा आमचा ऑस्ट्रेलियातील  प्रमुख शहरांचा चार दौऱ्यांचा अनुभव मी त्यांना सांगितल्यावर त्यांनी हे आव्हान स्वीकारले  आणि मनापासून तयारी केली. तेथील एका मोठ्या सभागृहात आधुनिक ध्वनी व्यवस्थेसह हा कार्यक्रम झाला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला लहान मुलेही पहिल्या रांगेत बसून शांतपणे ऐकत होती. काही अमराठी भारतीय सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. शास्त्रीय संगीत न ऐकलेल्या या रासिकांकरता सुरवातीला आम्ही रागावर आधारित प्रसिद्ध गीत वाजवून मग तो राग वाजवला. उदा: पुरिया धनाश्री रागातले प्रसिद्ध गीत ‘जीवलगा राहिले दूर घर माझे’ आणि नंतर झपताल आणि त्रितालातील बंदिशी वाजवल्या. त्यानंतरचे चार दिवस आम्ही हायडेलबर्ग येथे ज्योती ठकार यांचा मुलगा डॉ. नकूल याच्या घरी राहिलो होतो. तेथील सुप्रसिद्ध बीएएसएफ या कंपनीत तो संशोधन अधिकारी आहे. केमिकल इंजिनीरिंग मधील पेटंटस नावावर जमा असलेला नकूल पं. योगेश समसी यांच्याकडे तबलाही शिकतो आहे. हायडेलबर्गच्या जवळ असलेल्या ककू क्लॉक करता प्रसिद्ध असलेल्या ब्लॅक फॉरेस्ट आणि तेथील किल्ला यांनाही आम्ही बेट दिली.  युरोपमधील सर्व शहरांप्रमाणे दैनंदिन प्रवासाकरता सायकलीचा वापर करणारे सर्व वयातील स्त्री-पुरुष इथेही दिसले.

इंटरनॅशनल फेस्टिव्हल मध्ये वादन

 जूनला बर्लिन पासून तीन तासांच्या अंतरावर असलेले ब्राऊनश्वाईक येथे आंतरराष्ट्रीय उत्सवात भाग घेण्याची भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी तेथील मंडळाचे अध्यक्ष अमोल भागवत यांच्या निमंत्रणांमुळे मिळाली. तेथे दिवसभर चाललेल्या  या उत्सवामध्ये २० देशांचे नागरिक


नृत्य, गायन यांचा समावेश असलेले मनोरंजक कार्यक्रम सादर केली. त्याबरोबरीने  विविध देशांच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल ही होते. आम्हाला दिलेल्या अर्ध्या तासात वृंदावनी सारंग रागातील मध्य आणि द्रुत लयीतली गत आणि ‘वैष्णव जन’ हे भजन आम्ही सादर केले. त्यानंतर अमोल भागवत यांचा गायनात करीयर करणारा मुलगा वरद याने भारतीय आणि पाश्चात्य संगीतामधील गाणी सादर केली.  त्याबरोबर तबल्याची साथ मी केली होती. भारतीय संगीताला विविध देशातील नागरिकांसमोर  सादर करण्याचे श्रेय ब्राव्हो मंडळाचे अमोल भागवत आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आहे. ब्राऊनश्वाईक कौंसिल आणि महाराष्ट्र मंडळ यांच्यात पार्टनरशिप झाल्यामुळे संधी मिळू शकली.

 

 

आमचा शेवटचा कार्यक्रम बर्लिन मराठी मंडळातर्फे बर्लिन मधल्या डॉयचे बँकेत अधिकारी असलेल्या आणि सतार शिकत असलेल्या अमोल सायनीसने आयोजित केला होता. बर्लिन मधील आमचे वास्तव्य सुखाचे होईल याची संपूर्ण काळजी त्याने घेतली. तेथील ऐतिहासिक स्थळे बघण्याकरता बस-ट्रॅम चे मार्ग सांगून मोलाचे मार्गदर्शनही केले. विशेष हे की यापल्या शारीरिक मर्यादा बाजूला ठेऊन त्याने आमचा कार्यक्रम जवळजवळ एकट्याने  आयोजित केला. यामध्ये त्याला पं. वि
जय कोपरकरांकडे गाणे शिकणारा आर्किटेक्ट रौनक काळे  यांची मदत झाली. ३ जूनच्या सकाळी अमोल सायनीसच्या घरी झालेली  सतार- गायन -तबला अशी एकत्र मैफल छान रंगली.  दुपारी बर्लिन स्कूल ऑफ म्युझिक मध्ये झालेल्या  मैफिलीला बर्लिन मध्ये वास्तव्यास असलेल्या एक अमेरिकन स्त्री तबलावादक लॉरा पेटशेन याही  आल्या होत्या. विशेष म्हणजे त्यांनी दोन्ही मैफिलीना उपस्थित राहून त्यांनी दाद दिली.  त्या  गेली ३५ वर्षे तबला शिकत आहेत आणि तेथे तबला शिकवतात आणि कार्यक्रमांना साथ करतात.

 

युरोपमधील मराठी मंडळी  

बर्लिनमधले रोहित प्रभू  यांची ओळख पुण्यातील जर्मन भाषेच्या प्राध्यापिका डॉक्टर सविता केळकर यांनी करून दिली होती. उत्कृष्ट अध्यापक म्हणून 

सन्मान प्राप्त  झालेल्या सविताताई गेली अनेक वर्षे भारत आणि जर्मनी यांच्यामध्यें संस्कृतिक संबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने मोलाचे काम करत आहेत.  या कामगिरीबद्दल सविताताईना  जर्मन सरकारचा ऑर्डर ऑफ मेरिट पुरस्कारही मिळालेला आहे. रोहित प्रभु यांनी नंतर अमोल भागवत आणि अमोल सायनीस  यांच्याशी ओळख करून दिली आणि आमचे कार्यक्रम ठरले. आपापल्या क्षेत्रात  उत्तम कामगिरी बजावत मराठी मंडळांचे पदाधिकारी आणि स्वयंसेवक आपल्या नोकऱ्या सांभाळून पदराला खार लावून स्वत;चा वेळ घालवून मंडळाचे काम करतात. विदेशात  महाराष्ट्रीय  आणि भारतीय संस्कृतीची जपणूक करावी ही त्यांची धडपड असते.  सुप्रसिद्ध कलाकारांच्या कार्यक्र0

माला सभासदांची पसंती असल्याने त्यांना बोलावण्याकडे त्यांचा कल असतो. पण आमच्या सारख्या नाव नसलेल्या संगीतोपासकांचे कार्यक्रम या मंडळानी आयोजित केले हे विशेष आहे. कारण तेथील मंडळीना, विशेषत: तरुणांना फक्त वाद्य संगीत कितपत आवडेल यांची रास्त शंका आयोजकाना होती. पण आपल्या मुलांना उच्च दर्जाच्या हिंदुस्तानी संगीत ऐकवण्याची आमची विनंती या मंडलांनी मान्य केली. कार्यक्रम सादर करताना भारतीय रागसंगीत, सतार आणि तबला ही वाद्ये, याविषयी थोडीशी माहिती मी देत असे. ‘या निवेदानामुळे आम्हाला  वादनाचा आस्वाद अधिक चांगल्या रीतीने घेता आला’ असे काहीनी आवर्जून सांगितले. युरोपमधल्या या मंडळींशी आमचे स्नेहबंध  जुळले आहेत.  ‘धन्य ते गायनी कला’ असे समर्थ रामदासांनी वर्णन करून संगीत कलेची महती सांगितली आहे. भविष्यकालातही या थोर संगीत कलेचा परिचय  युरोपमधील तरुण पिढीला करून देण्याकरता आम्ही उत्सुक आहोत.

 

 Author: Arvind Paranjape,

asparanj@gmail.com, +919850569075

 

(for more information on the Artists: https://thakarsitar.wordpress.com and www.arvindparanjape.in)

*****

Labels:

Tuesday, August 27, 2024

म्युच्युअल फंडाची दुसरी बाजू



म्युच्युअल फंडाची दुसरी बाजू 




 म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे सर्वात उत्तम परिणामकारक साधन म्हणून आता लोकप्रिय झाले आहे. एसआयपी हा शब्द तर आता बहुतेक गुंतवणुकदारांना परिचित झाला आहे.  म्युच्युअल फंडांचे एकूण मालमत्ता मूल्य (अ‍ॅसेट्स अंडर मॅनेजमेंट) हे ६५  लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. यातील विशेष  बाब म्हणजे यातील निम्मे  एयुएम हे सामान्य (रिटेल) गुंतवणुकदारांचे आहे. सध्या तब्बल ९  कोटीपेक्षा अधिक एसआयपी खात्यांमधून दर महिना  २६ हजार कोटीपेक्षा अधिक रक्कम म्युच्युअल फंड योजनांमध्ये जमा होते आहे. एकूण ए.यु. एम. मधील 6 लाख कोटी रुपये हे केवळ एसआयपीच्या माध्यमातून जमले आहेत. अंफि आणि  ईलेक्ट्रॉनिक माध्यमे, "म्युच्युअल फंड सही है" हा प्रचार करत आहेत . याला म्युच्युअल फंड वितरक आणि सल्लागारांचे प्रोत्साहन मिळते आहे.  यामुळे आता आपला देश गुंतवणूक क्षेत्रात आत्मनिर्भर होत आहोत. गेल्या दोन वर्षांची आकडेवारी दर्शवते आहे की आपल्या देशाला आता परकीय अर्थसंस्थांवर अवलंबून रहाण्याची वेळ येत नाही. परकीय अर्थसंस्थांनी विक्री  केली  तरी भारतीय गुंतवणुकदार तेवढीच  खरेदी  करतात. त्यामुळे भारतीय बाजार चढाच रहातो आहे. 

 गुंतवणूकदारांची जबाबदारी

 निर्देशांकापेक्षा अधिक सरस कामगिरी करून म्य्चुयुअल फंडसुद्धाआपली उपयुक्तता सिद्ध करत आहे. पण  म्युच्युअल फंडयोजनांची पुरेशी माहिती मिळवून नंतर पैसे गुंतवले पाहिजेत. त्याकरता वेळही काढायला हवा. माझ्या अनुभवावरून असे नक्की सांगता येईल की आपला पोटापाण्याचा व्यवसाय वेगळा असला तरी म्युच्युअल फंड योजनांची चांगली माहिती जे मिळवतात त्यांची गुंतवणूक योग्य दिशेने होते. जसं की एखाद्या ठिकाणाहून दुसरीकडे जायला सगळ्यात चांगला मार्ग आणि साधन कोणते हे ठरवताना आपल्याला जर पर्यायांची योग्य माहिती असेल तर आपला प्रवास जसा सुकर होतो तसेच. 

‘फॅक्ट शीट

प्रत्येक म्युच्युअल फंड दर महिन्याला आपल्या योजनांच्या कामगिरीचे सविस्तर वर्णन करणारी पुस्तिका प्रसिद्ध करते. त्याला ‘फॅक्ट शीट’ म्हणतात. म्युच्युअल फंड कंपन्यांच्या वेबसाईटवर त्या उपलब्ध असतात. या फॅक्टशीट मध्ये बहुतेक सर्व माहिती आकडेवारीसह उपलब्ध असते पण त्यासाठी त्यातील संकल्पना समजून घेतल्या तर ते फारसे अवघड नाही. आर्थिक माहिती देणार्‍या वेबसाईट्सवर इतर योजनांबरोबरची तुलनात्मक माहितीसुद्धा मिळते ती सुद्धा महत्त्वाची असते. स्टार रेटिंगला जास्त महत्त्व  देऊ नये पण त्यांचा विचार करावा. 

सेबीची जोखीमरंरक्षण नियमावली
1996 मध्ये सेबीने प्रथमत: म्युच्युअल  फंडांचे कामकाज कसे चालवावे यावर कडक नियमावली जारी केली. त्यानंतर वेळोवेळी त्यात बदल करून सुधारणा केल्या आहेत. या वेगवेगळ्या नियमावली व मार्गदर्शक सूत्रांमधून दैनंदिन कामकाज कसे चालवायचे आणि गुंतवणूक कशी करायची याविषयी करण्यावर बंधने आहेत. सप्टेंबर 2021 मध्ये जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार पुढील नेमणुका करणे अनिवार्य केले आहे.
1. चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर - गुंतवणुकीतली जोखीम व अन्य व्यवस्थापन
2. चीफ कम्प्लायन्स ऑफीसर
3. चीफ ऑपरेटिंग ऑफीसर
4. चीफ सायबर सेक्युरिटी ऑफिसर
5. चीफ रिस्क ऑफिसर
या सर्वांचा समावेश असलेली एका जोखीम व्यवस्थापन समिती आणि गुंतवणूक समिती यांची स्थापना करणे जरुरीचे आहे. या समितीने मार्केट रिस्क, क्रेडिट रिस्क आणि लिक्विडिटी रिस्क यासह अन्य जोखमीच्या बाबी कोणत्या आहेत ते निश्चित करून त्यांचेही व्यवस्थापन करणे अपेक्षित आहे. या सर्वाचे कामकाज नियमानुसार चालते की नाही हे बघण्याची जबाबदारी व्यवस्थापक आणि म्युच्युअल फंडांचे विश्वस्त यांच्यावर आहे. नवीन योजना काढणे, गुंतवणुकीचे मूल्यमापन करणे, गुंतवणुकीना वेगवेगळे निकष लावणे, बेंचमार्कच्या तुलनेत कामगिरी कशी आहे याचा आढावा घेणे अशी अनेक कामे या समितींनी करायची आहेत. सातत्याने हॉट असलेल्या या सुधारणांमुळे म्युच्युअल फंडांवरचा भरवसा वाढला आहे.

म्युच्युअल फंड- गुंतवणुकीचे 'वन स्टॉप सोल्यूशन'

व्यावसायिक व्यवस्थापन, विविधतेतून जोखीम व्यवस्थापन, प्राप्तिकर सवलती, पारदर्शकता, व्यवहार सुलभता असे म्युच्युअल फंडाची शक्ती आहेच.  पण त्यांच्यावर आपल्या गुंतवणुकीची जबाबदारी सोपवून आपल्याला मिळणारी मन:शांति हा सर्वात मोठा फायदा आहे. अर्थात या बरोबरीने काही मर्यादाही आहेत ज्या आपण समजून घेतल्या पाहिजेत. 
म्युच्युअल फंडाच्या मर्यादा
1- जास्त विविधता (Excessive diversity)
सर्व अंडी एकाच टोपलीत ठेऊ नका हे आपल्या मनावर बिंबवलं गेलं आहे. तत्त्व म्हणून ते जरी खरं असलं तरी ते  सर्व परिस्थितीत लागू पडत नाही. "एकाच टोपलीत सर्व अंडी ठेवा आणि त्या टोपलीकडे बारकाईने लक्ष द्या" असं मार्क ट्वेनने म्हणले आहे ते निश्चितच विचार करण्यासारखे आहे. ज्याला आक्रमक धोरण स्वीकारायचे आहे त्याला खूपसाऱ्या  कंपन्यांचे शेअर्स घेऊन अपेक्षित परतावा मिळत नाही. 
वॉरन बफे यांनी तर म्हणले आहे की ‘‘विविधता म्हणजे अज्ञानापासूनचे संरक्षण! जेंव्हा तुम्ही काय करत असता हे समजत असेल तेंव्हा विविधतेची गरज असते.‘‘ ज्या विद्यार्थ्यांना प्रश्नाचे नेमके उत्तर माहित नसते तेंव्हा परीक्षेत ते जसे पाल्हाळ लावून इकडचे तिकड्चे काहीतरी लिहितात, तसे जेंव्हा तुम्हाला नक्की काय करायचे ते समजत नसते.  त्यावेळी तुम्ही विविध क्षेत्रातल्या,  देशांमधल्या, अनेक प्रकारच्या योजना घेण्याच्या मागे लागता, असा वॉरन बफे यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे. नक्की किती विविधता म्हणजे डायव्हर्सिफिकेशन असली पाहिजे  या विषयी तज्ञांचे एकमत नाही. पण शेअर्सचा पोर्टफोलिओ असेल तर 20 ते  30 कंपन्यांमधील गुंतवणूक जोखीम कमी करू शकते असे तज्ञांचे मत आहे. त्यापेक्षा जास्त कंपन्यांचा समावेश जोखीम फारशी कमी करत नाहीच पण  अधिक संख्येच्या कंपन्यांचा सतत अभ्यास करत रहाणे (ट्रॅक़ करणे) शक्य होत नाही. विविधतेने जोखीम जशी कमी होते तसा परतावाही कमी होऊ शकतो. असेच मत प्रसिद्ध गुंतवणुकदार विल्यम  ओनेल यांनी व्यक्त केले आहे.  ‘यशस्वी गुंतवणुकदार अनेक शेअर्समधून किरकोळ नफा मिळवण्यापेक्षा एक/दोन कंपन्यातूनच रग्गड नफा मिळवतो‘. असं विल्यम ओनेल म्हणतात ते विचार करण्यासारखे आहे. 

मर्यादा 2  - योजनांची जास्त संख्या : निवड करणे सोपे नाही
देशात  सध्या ४५ पेक्षा जास्त म्युच्युअल फंड कंपन्या आहेत.  सेबीने केलेल्या  वर्गवारीनुसार इव्किटी प्रकारात 10, डेट प्रकारात 16, हायब्रीड प्रकारात 6, आणि अन्य प्रकारात 4 असे एकूण 36 प्रकार आहेत. या सर्व प्रकार/उपप्रकारात या ५०  म्युच्युअल फंड कंपनींच्या तब्बल २०००  पेक्षाही अधिक योजना आहेत. एवढ्या प्रचंड संख्येने असलेल्या योजनांमधून आपल्याला योग्य आणि लाभदायी अशा योजना निवडणे सोपे नाही. या बरोबरीने आता पॅसिव्ह फंड आणि  ए.आय.एफ. म्हणजे आल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड प्रकारातही अनेक म्युच्युअल फंड योजना आणत आहेत. इन्श्युरन्स कंपन्यासुद्धा पारंपारिक आणि युलिप प्रकारातील योजना 'गुंतवणुकीकरता' म्हणून पुढे रेटत असतात.  त्यामुळे निवड करणे हे सोपे नाही. गुंतवणुकदाराने स्वत: भरपूर  होमवर्क करणे हा यावरचा उपाय आहे. किंवा चांगला अर्थ सल्लागार गाठणे!

मर्यादा 3  - व्यवस्थापन खर्च
सेबीच्या कडक नियमावलीचे पालन करण्यकरता  (Compliance cost) आणि युनिटधारकांना सेवा पुरवण्याकरता बरेच कर्मचारी नेमावे लागतात.  तसेच गुंतवणुकदारांचा विश्वास संपादन केलेल्या म्युच्युअल फंड वितरकांनाही योग्य तो मोबदला देणे आवश्यक असते. त्यामुळे योजना राबवायचा खर्च वाढतो आहे. यावर सेबीचे नियंत्रण आहे आणि डायरेक्ट गुंतवणूक करण्याची सोयही आहे. 

मर्यादा 4  -  गुंतवणूक करण्यावरील बंधने
गुंतवणुकीत व्यापकता यावी ((कॉन्सन्ट्रेशन) रिस्क कमी व्हावी) म्हणून हे  म्युच्युअल फंड कशी आणि कक्षात गुंतवणूक करू शकतात त्याकरता  ’सेबीची नियमावली, आहे.  जोखीम व्यवस्थापन, योजनेच्या उद्दिष्टानुसार आणि वर्गवारीनुसारच शेअर्स आणि रोखे यांची निवड करण्याचे बंधन असते.  या चौकटीतच  फंड व्यवस्थापकाला काम करायचे असते. या करता पुढील नियमांचे पालन करायला लागते.
  • ‘ एका म्युच्युअल फंडाच्या सर्व योजना मिळून एका कंपनीच्या 10% पेक्षा अधिक भांडवलाचा हिस्सा खरेदी करता येत नाही.
  • ‘ एका योजनेला त्या योजनेच्या एकूण 10% पेक्षा अधिक गुंतवणूक एकाच कंपनीच्या शेअर बाजारावरती नोंद असलेल्या शेअर्समध्ये करता येत नाही, तर शेअरबाजारावर नोंद न झालेल्या कंपनीत जास्तीत जास्त 5%च करता येते.
  • ‘ म्युच्युअल फंडाला आपल्या प्रवर्तकांच्या कंपन्यांमध्ये एकूण 25% पेक्षा अधिक गुंतवणूक करता येत नाही.
  • ‘ डेट फंड योजनेकरता एका गुंतवणूकयोग्य (इन्व्हेस्टमेंट ग्रेड)  कंपनीत योजनेच्या 10% मूल्यापेक्षा अधिक गुंतवणूक करता येत नाही.
याशिवाय म्युच्युअल फंडाने केलेली अंतर्गत नियमावली असते. 
या बंधनांमुळे एखाद्या शेअरमधील खरेदी कितीही फायदेशीर वाटले तरी एका कंपनीत/क्षेत्रात घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक गुंतवणूक करता येत नाही. तसेच शेअर बाजाराच्या मूल्यांकनानुसार  जास्त रोख रक्कम ठेवणे असे करता येत नाही.

मर्यादा 5 : सततचे मूल्यमापन
दर महिन्याला योजनेच्या कामगिरीचे मूल्यमापन आणि निर्देशांकाबरोबर तुलना हे होत असते. त्यामुळे थोड्या काळाकरता (उदाहरणार्थ, गुंतवणूकदारांचे समाधान करण्याकरता/योजनेची विक‘ी वाढवणे/स्पर्धा इत्यादी) अधिक परतावा मिळवण्यावर भर दिला तर त्याचा दीर्घकाळात फायदा मिळवण्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.

मर्यादा 6 -  खरेदी-विक्रीवर नियंत्रण नाही
म्युच्युअल फंड योजना या खुल्या- ओपन एंडेड असल्याने युनिटधारकाच्या मर्जीनुसार त्यातील युनिटसी खरेदी किंवा विक्री  योजनेच्या व्यवस्थापकांना करावी लागते. त्यामुळे योजनेची कामगिरी जेव्हा चांगली होत असते तेव्हा गुंतवणूकदार अधिक पैसे घालू लागतात. त्यावेळी आलेला अधिकच्या पैशातून  करावी लागणारी खरेदी फायदेशीर होतेच असे नाही. तसेच जेव्हा गुंतवणूकदार पैसे काढून घेऊ लागतात तेव्हाही चांगले शेअर्स विकावे लागतात. विशेषत: मिड कॅप आणि स्मॉल कॅप योजनां’ हा धोका जास्त असतो.

मर्यादा 7  - दीर्घकाळाचा विचार करता येत नाही
म्च्युच्युअल फंड व्यवस्थापकाला त्याच्या मनाप्रमाणे खरेदी-विक्री करताच येईल असे सांग़ता येत नाही. जर योजनेमध्ये रोख रक्क्म  (कॅश बॅलन्स) ठेऊ नये असे बंधन असेल तर बाजार कितीही महाग असला तरी  खरेदी करावी लागते. योजनेच्या अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन व अन्य अटींनुसारच खरेदी-विक्री  करावी लागते. त्यामुळे अल्पकाळामध्ये शेअरनिर्देशांकापेक्षा कमी प्रतीची कामगिरी होणे शक्य असते. बहुसंख्य गुंतवणुकदार  दीर्घकाळाचा विचार करत नाहीत त्यामुळे फंडव्यवस्थापकालाही 'व्हॅल्यु ओरिएंटेड शेअर्स' घेण्यावर मर्यादा येतात.

मर्यादा 8 -  बाजारसापेक्ष परतावा
म्युच्युअल फंड मॅनेजर चे मुख्य लक्ष निर्देशांकाच्या तुलनेने अधिक चांगली करून सापेक्ष परतावा देणे हे असते. 'It is a relative profit product and not an absolute profit product" त्यामुळे म्युच्युअल फंड कायम फायदाच देईल आणि तोटा होणार नाही' अशी अपेक्षा ठेवता येत नाही. बाजारातल्या शेअर्स आणि रोखे यांच्या किमतींवर होत असलेल्या परिणामापासून म्युच्युअल फंडातली गुंतवणूक अलिप्त राहूच शकत नाही.  

मर्यादा 9 - गुंतवणूकदारांच्या अवास्तव अपेक्षा 
मागील 4 वर्षात 30% -40% पेक्षा अधिक वार्षिक परतावा मिळाल्याने पुढेही आता एवढा फायदा होईल असे अनेकांना  वाटू लागले  आहे. तसेच काही गुंतवणुकदारांची अपेक्षा असते की पुढील काळात शेअरबाजार  चढेल का पडेल याचे ज्ञान फंडमॅनेजर्सना असले पाहिजे आणि त्यानुसार त्यांनी खरेदी-विक्री  करून आम्हाला नेहमी फायदा मिळवून दिला पाहिजे.  शेअरबाजाराचा अल्पकाळातला कल कोणालाही समजत नसल्याने अर्थातच हे म्हणणे  रास्त नाही. 
या शिवाय कधी तरी म्युच्युअल फंड कंपन्यांचे कर्मचाऱ्यांवर फ्रंट रनिंग साराखी  कृत्ये करतात असे आरोप होतात.  पण हे प्रमाण नगण्य असले तरी त्याचा विश्वासार्हतेवर थोडा काळ परिणाम होतो. 
भविष्य काळ कसा आहे?
भारतीय म्च्युच्युअल फंडांनी गेल्या 30 वर्षात निर्देशांकांपेक्षा सरस कामगिरी नोंदवली आहे. त्यामुळे त्यांच्या कामकाजावरच्या या मर्यादा लक्षात घेऊन गुंतवणूक करताना आपण रास्त अपेक्षा ठेवल्या पाहिजेत. आणि ’फक्त  परताव्याकडे लक्ष देऊ ने. त्यांनी जोखीम व्यवस्थापन किती चांगले केले आहे आणि योजनेच्या उद्दिष्टानुसार गुंतवणूक आहे ना हे पण बघितले  पाहिजे.
जागतिक पातळीवर आपल्या देशाचा जीडीपी विकास दर अन्य देशांच्या तुलनेत सर्वात जास्त (सुमारे 7%) असण्याची शक्यता आहे. ज्या देशाचा आर्थिक विकासाचा दर जास्त तेथील शेअरबाजार चांगला परतावा देतो.  पुढील काही महिन्यात महागाईचा दर आटोक्यात येऊन व्याजदर कमी होतील असे वाटते आहे. त्यामुळे डेट फंडातही आकर्षक परताव्याची संधी आहे. हे  दशक भारताचे असल्याने गुंतवणुकदारांनी म्युच्युअल फंडाच्या माघ्यमातून आपली खरेदी चालू ठेऊन आपली आर्थिक उद्दिष्टे साध्य करावीत.
काही आक्रमक गुंतवणुकदार हे स्वत: शेअर्सखरेदी-विक्री  करण्यात वाकबगार असतात आणि उत्तम फायदाही कमावतात. त्या दृष्टीकोनातून बघितले तर ते समुद्रात अट्टल पोहणारे असतात त्यांना शार्क माशांचीही भीती वाटत नाही. त्यांना असे वाटते की  म्युच्युअल फंडातील युनिटधारक हे सुरक्षित तलावात पोहणारे असल्याने ते नवशिके आहेत. पण अनेकदा असे पट्टीचे पोहणारे फाजील आत्मविश्वासाला बळी पडतात असेही दिसून येते. अशा आक्रमक आणि वाढीव परताव्याची अपेक्षा असणार्‍या गुंतवणुकदारांना पीएमएस-पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्विसेसमध्ये गुंतवणूक हा पर्याय असू शकतो. 



*****

Labels: , , , , ,