Thursday, January 16, 2025

एसआयपी - संपत्ती निर्माणाची गुरुकिल्ली

 एसआयपी - गुंतवणुकीचा हुकमी एक्का

अरविंद परांजपे

 

 

'रोेम एका दिवसात बांधले गेले नाही'हे  सुप्रसिद्ध वचन आपल्याला माहित आहे. पण  फक्त सहा शब्द असलेल्या या वाक्यात फार मोठा अर्थ दडला आहेकारण रोम साम्राज्याची उभारणी कित्येक वर्षे चालू असल्यानेच ते साम्राज्य बनले. यावरून हे लक्षात येते की कोणतीही मोठी गोष्ट करायला दीर्घकाळाचे नियोजनप्रयत्न आणि चिकाटी लागते.  गुंतवणुकीच्या बाबतीतसुद्धा हे फार मोलाचे आहे. दर महिन्याला वाढत जाणारा म्युच्युअल फंडातील एसआयपीचा आकडा बघितला तर भारतीय गुन्तवणुकदारांनी या उक्तीचे महत्त्व  ओळखले आहे असे म्हणता येईल.

फक्त डिसेंबर 2024 मध्ये सुमारे तब्बल २६,००० कोटीपेक्षा अधिक रक्कम जमा झाली आहे.  म्युच्युअल फंडातील एकूण रक्कम ही एकोणसत्तर  लाख कोटी चा आकडा ओलांडला आहे. 

लाभदायी एसआयपी कसे करावे?

एसआयपीचा प्रचार खूप झाला आहे. इतका की काही जण (अज्ञानापोटी) असे म्हणतात की आम्ही एसआयपी केले आहे पण् म्युच्युअल फंडात आमची काहीच गुंतवणूक नाही!   त्यामुळे पुरेशी माहिती न घेता एसआयपी केले तर त्याचा  पाहिजे तेवढा उपयोग होत नाही. त्यातून अधिक फायदा होण्याकरता त्यातल्या कमतरता दूर केल्या पाहिजेत. तरच उद्दिष्टपूर्ती अधिक चांगली होईल. त्यासाठी पुढील  मुद्दे लक्षात ठेवा.

1.           अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन ही पहिली पायरी विसरू नका. तुमची आर्थिक उद्दिष्टे निश्चित करून आणि त्याकरता योग्य अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन करूनच एसआयपीची सुुरवात झाली पाहिजे. म्हणजे किती रक्कम कधी उभी करायची आहे आणि त्याकरता गुंतवणूक प्रकार कोणता याची निश्चिती झाल्यावरच एसआयपी सुरू करा. प्रत्यक्षात फारसा विचार न करता (मनाला येईल ती) रक्कम आणि सर्वात जास्त रिटर्न दिलेल्या म्युच्युअल फंड योजना ठरवल्या जातात.

2. रक्कम जास्तीत जास्त हवी.  

  अनेक वेळेला शक्य असूनही एसआयपी कमी रकमेचा केला जातो. म्हणजे 50 सूर्यनमस्कार घालण्याची क्षमता असूनही जर फक्त 20 घातले तर पुरेसा व्यायाम होणार नाही. म्हणजे जर 50,000 रुपयाची एस आयपी शक्य  असेल तर न घाबरता तो करावा. त्यामुळेच तुमचे उद्दिष्ट लवकर पूर्ण होईल. 

3.  आधी बचत मग खर्च 

 एसआयपीची रक्कम ठरवताना 

जमा - खर्च = गुंतवणूक असे समीकरण न मांडता  

उत्पन्न -गुंतवणूक = खर्च असे समीकरण मांडा. त्यामुळे तुम्ही किमान बचत करालच!

4.   योजनेची निवड महत्त्वाची 

       3 वर्षापेक्षा जास्त कालावधीतच्या उद्दिष्टांकरता  इव्किटी म्युच्युअल फंड योजनांचा विचार करावा. इक्विटी शेअर्समधे होणारे चढ-उतार एसआयपीला उपयुक्त असतात. आणि दीर्घ काळात त्याची जोखीमही कमी होते. त्यापेक्षा कमी काळाकरता हायब्रिड योजना उपयोगी ठरतील. 

5. हायब्रिड योजना 

  सुरवातीला तुमच्या अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशनुसार म्युच्युअल फंडातल्या अ‍ॅग्रेसिव्ह इव्किटी हायब्रीड प्रकारातील योजनांचा विचार करावा. त्यांचे परतावे इक्विटी योजनेच्या तुलनेत जोखीम-सापेक्ष परतावा जास्त देऊ शकतात. 

6.           बॅलन्स अ‍ॅडव्हांटेज फंड किंवा इव्किटी फंड योजना एसआयपी पेक्षा एकरकमी गुंतवणुकीकरता अधिक उपयुक्त आहेत. त्या योजनांमधील  वाढ पूर्ण इव्किटी योजनांपेक्षा कमी असल्याने जोखीम कमी असते. त्यातले एसआय पी  अल्प कालीन उद्दिष्टाकरता करायला हरकत नाही.

7.           तुमच्या आर्थिक उद्दिष्टानुसार एकूण योजनांची संख्यात्यातील रक्कम आणि एसआयपीचा कालावधी ठरवा.

उदा: उद्दिष्ट: निवृत्तीची तरतूदउद्दिष्ट रक्कम: 5 कोटी रुपयेेकालावधी 30 वर्षेयोजनेचा अपेक्षित परतावा दरसाल दर शेकडा 12% गृुहीत धरून 14,300 रु एवढे एस आय पी लागेल. त्याकरता म्च्युच्युल फंडाच्या फोकस इव्किटी मधे 6000 रु.चेमल्टिकॅप इक्विटी 5,000 चे आणि मिडकॅप इव्किटी योजनेत 3,300 रु. ची एस आय पी करता येतील. (हे फक्त उदाहरणादाखल सूचित केले आहे.)

8.           अशी सर्व तयारी झाल्यावरच  अर्ज भरून  पहिला चेक द्या. नंतरचे हप्ते तुमच्या बँक खात्यातून ठरवलेल्या दिवशी ईसीएसने परस्पर भरली जाईल. दर महिना चेक द्यायची गरज नाही. एनएसई वरून किंवा अ‍ॅप वरूनही एसआय पी करता येतात.

9.           शेअर बाजार चंचल असणार हे गृहित धरा आणि बाजार घसरला तरीही एसआयपी थांबवू नका. कारण ज्या दिवशी तुमची रक्कम योजनेत जमा होते त्या दिवशीच्या एनएव्हीने तुम्हाला युनिट्स मिळतात. जेंव्हा कमी एनएव्ही असेल तेंव्हा जास्त युनिट्स मिळतात.

10.         एसआयपी ची संख्या जास्त म्हणजे जोखीम कमी हा गैरसमज आहे. म्युचुअल फंडाच्या एकाच प्रकारच्या योजनांमध्ये अनेक एसआयपी केले तरी अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन तेच रहिल्याने जोखीम कमी होत नाही. त्याऐवजी लार्जफोकसमल्टीमिड आणि स्मॉल कॅप अशा वेगळ्या प्रकारच्या  योजनांमध्ये नियमितपणे दीर्घ काळ गुंतवणूक करण्याकडे लक्ष द्यावे. उदा: लार्ज कॅप योजनांमध्ये 1,000 रुपयांच्या 5 एस आय पी ऐवजी 3,000 रुपयांचा एक एसआयपी लार्ज कॅप आणि 2000 रुपयांचा एक एसआयपी मिडकॅप योजनेत करता येईल.

11.         एसआयपीची रक्कम ठरवताना सहज जमेल त्यापेक्षा थोडे वरचे लक्ष्य ठेवा. आव्हान असले तर काम करायला जास्त प्रेरणा मिळते. 

12.         एसआयपीतून कायम फायदाच होईल असे नाही. शेअर बाजार खाली जात राहिला तर तोटा होउ शकतो. त्यामुळेच बाजार पडला तरी एसआयपी चालूच ठेवावे म्हणजे  तेंव्हा मिळणार्‍या युनिट्सची सरासरी खरेदी किंमत कमी होते. गंमतीने असेही म्हणता येईल की  ’माझे एस आयपी चालू असेपर्यंत  बाजार पडलेलाच रहावा व मला अधिक युनिट्स मिळावेत!’

13.         एसआयपी ची मुदत संपल्यानंतर त्यात जमा झालेली रक्कम काढली पाहिजे असे नाही. ती शेअर बाजाराप्रमाणे वाढू शकते. जर तुम्हाला पैसे हवे असतील  तरच पैसे काढण्याचा विचार करा. त्या योजनेची कामगिरी खालावली असेल तर ती रक्कम दुसर्‍या अधिक चांगल्या योजनेकडे  वळवता येईल.

14.         मुदत संपण्यापूर्वी मध्येच रक्कम लागली तर एसआयपी बंद न करताही पाहिजे तेवढी रक्कम जमलेल्या रकमेमधून काढता येते.

15.         अगाऊ सूचना देऊन एसआयपी कधीही बंद करता येतो/ थांबवता येतो. त्याला काही दंड नाही. पण त्यामुळे तुमची गुंतवणूकही थांबणार! तुम्हाला काही कारणाने 2-3 महिने रक्कम भरणे शक्य नसेल तर एसआयपी पॉज करून नंतर तो परत चालू करता येतो.

16.         जोखीम कमी करण्याच्या दृष्टीने एसआयपीच्या तारखांमध्ये अंतर ठेवावे. उदा: 2 एस आय पी असतील तर महिन्यातील 1 आणि 15 तारीख, 3 एसआयपी असतील तर  1,10 आणि 20 तारीख असे ठरवू शकता.

17.         एसआयपी कितीही काळाकरता करता येते. पण एकावेळी साधारणपणे 3 वर्षे कालावधीकरता एसआयपी करावे. याचा फायदा म्हणजे 3 वर्षांची मुदत संपल्यानंतर  तीच योजना चालू ठेवणे किंवा बदलणे आणि रक्कम वाढवणे यावर नक्कीच विचार होईल. 

18.         कुटुंबातील सर्व मिळवत्या व्यक्तींनीचे एसआयपी केले तर सर्वांचाच फायदा होईल. पहिला पगार चालू झाला की एसआयपी सुरू करा.

19.         ’स्टेप-अप’ एसआयपी -  तुमचे उत्पन्न जसे वाढते तसे एसआयपी ची रक्कम ही वाढली पाहिजे. याकरता स्टेप-अप एसआयपी उपयोगी आहे. याची निवड केली तर तुमच्या एस आयपीची मूळ रक्कम दर 6 किंवा 12 महिन्यांनी वाढवत नेता येते. उदा: जर 10,000 रुपयांचे 10 वर्षांसाठी एस आय पी सुरू केले असेल आणि दर वर्षी 1,000 रुपयांच्या वाढीचा पर्याय निवडला तर पुढच्या वर्षांमध्ये एसआयपीची रक्कम 11,000, 12,000 अशी वाढत जाऊन 10 व्या वर्षी ही रक्कम 19,000 होईल. तुमची आर्थिक उद्दिष्टे लवकर पूर्ण व्हायला  याचा मोठा उपयोग  आहे.  तसेच सुरवात करताना जास्त रक्कम नसेल तर नंतर वाढवण्याची तरतूदही यातून होऊ शकते. तुम्हाला 60 व्या वर्षी 5 कोटी रुपयांचे लक्ष गाठण्यासाठी 30व्या वर्षापासून 14,307 रुपयांचे एस आय पी करणे किंवा 5,717 रुपयांचे एस आय पी सुरू करून त्यात दर वर्षी10% स्टेप अप करूनही हे उद्दिष्ट साध्य होईल. (अपेक्षित परतावा दरसाल दर शेकडा 12%)

20.         योजना निवडताना म्युच्युअल फंडकंपनीची गुणवत्ताफंडमॅनेजरची कारकीर्दयोजनेची कामगिरी आणि योजनेचा पोर्टफोलिओ यांचा विचार करावा. 

 एसआयपी -संपत्ती निर्माणाची गुरुकिल्ली 

एस आय पी चा मुख्य फायदा म्हणजे तुम्हाला न कळत तुमची गुंतवणूक सातत्याने दीर्घ काळपर्यंत  होत रहाते. पत्त्याच्या खेळात जसे हुकुमाचा एक्का निश्चित हात करून देतो तसे या तत्त्वांचे पालन करून केलेले एसआयपी तुमची आर्थिक उद्दिष्टे गाठायला निश्चित मदत करतील.

Labels:

1 Comments:

At January 16, 2025 at 7:31 PM , Anonymous Anonymous said...

Systematic Investment Plan is a key step in Mutual Funds.Awareness is must while investing in MF.Informative article Dada.🙏😊💐

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home